
अक्कलकोट : यंदाच्या श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ही माहिती दिली.
श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह, दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होणार आहे. तिसऱ्या सप्ताहात ह.भ.प. योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर (श्री क्षेत्र गोंदी, जि. जालना) यांची गोकुळ अष्टमी व गोपाळकाल्यानिमित्त कीर्तन सेवा, तर चौथ्या सप्ताहात लातूर येथील ह.भ.प. श्रीमंत पांचाळ यांच्या वाणीतून हरीपाठ व रामकथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
हे सर्व कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहेत. यामध्ये आध्यात्मिक कथा, कीर्तन, भक्तिसंगीत, भजन आणि गीता पठण आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
दरम्यान, श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी नित्यनियमाने होणारी श्रींची नैवेद्य आरती सकाळी ११.३० वाजता न होता सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. आरतीनंतर देवस्थानच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर रात्रीची शेजारती होणार नसल्याची नोंद सर्व भाविकांनी घ्यावी, असे मंदिर समितीने कळविले आहे.
श्रावणमासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.






Subscribe to my channel






