माजी खा. विनायक राऊतांवर मंत्री नितेश राणेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

२८ वर्षांची साथ सोडून निकटवर्तीय सचिन सावंतांसह ठाकरे सेनेचे अनेक शिलेदार भाजपमध्ये

कणकवली : कणकवलीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे सेनेचे कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघांचे माजी विधानसभाप्रमुख सचिन सावंत यांनी २८ वर्षांची उबाठा सेनेसोबतची राजकीय नाळ तोडत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे सेनेला कणकवलीत मोठा राजकीय हादरा बसला आहे.

सचिन सावंत यांच्या प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय असलेला प्रमुख चेहरा भाजपच्या गोटात दाखल झाल्याने ठाकरे सेनेच्या संघटनेला थेट धक्का बसल्याची चर्चा कणकवलीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. सावंत यांच्यासोबत उबाठा सेनेचे अनेक सक्रिय कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाल्याने हा केवळ एक पक्षप्रवेश न राहता ठाकरे सेनेच्या स्थानिक संघटनेला मोठे भगदाड पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

२८ वर्षांचा प्रवास संपवून ‘कमळा’ची साथ!

गेल्या २८ वर्षांपासून उबाठा सेनेत सक्रिय असलेल्या सचिन सावंत यांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे कणकवली-देवगड-वैभववाडी परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सचिन सावंत यांच्यासोबत कसवणचे माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, सतीश सापळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गांवकर, विलास सावंत, सखाराम घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, सुरेश गुरव, वैभव शेटये, सत्यवान मेस्त्री, अजित मेस्त्री, हळवलचे माजी उपसरपंच विष्णू ठाकूर, दिलीप ठाकूर, राज सावंत, मंगेश राजाध्यक्ष, उमेश मेस्त्री आदी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उबाठातून शक्य होत नव्हते

पक्षप्रवेशानंतर सचिन सावंत यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना उबाठा सेनेला अप्रत्यक्षपणे घरचा आहेर दिला. “पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता निर्माण झाली आहे. पालकमंत्री त्या दृष्टीने काम करत आहेत. गावातील आणि विविध भागातील जनतेच्या मागण्या उबाठा सेनेच्या माध्यमातून पूर्ण करू शकत नाही. त्यामुळेच भारतीय जनता पक्षात आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे सावंत यांनी सांगितले.

पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी “भारतीय जनता पक्षाचा विजय असो”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कळसुली जिल्हा परिषद सदस्या शीतल दळवी, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, वागदे सरपंच संदीप सावंत, सरपंच मिलिंद सर्पे, उपसरपंच भाई सावंत, चेअरमन प्रशांत सावंत, माजी सरपंच अशोक सर्पे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!