
विजेत्याला ११,१११ रुपयांचे बक्षीस : केदार झाड मित्रमंडळाचे आयोजन
मालवण : पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची रंगत देत केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य ‘नारळ लढवणे स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भूतनाथ मंदिराजवळ ही स्पर्धा रंगणार असून, कोकणातील पारंपरिक नारळ लढवण्याच्या खेळाचा थरार अनुभवण्याची संधी स्पर्धक व रसिकांना मिळणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११,१११ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ७,७७७ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन स्पर्धकांनाही प्रत्येकी २,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क ४०० रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार असून, सहभागी स्पर्धकांना मंडळाच्या वतीने नारळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला पाच नारळ दिले जाणार असून, स्पर्धा १० गटांमध्ये खेळवली जाणार आहे.
नारळ लढवण्याच्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक युवकांना एकत्र आणणे आणि मनोरंजनातून पारंपरिक संस्कृतीची जपणूक करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. त्यामुळे या अनोख्या स्पर्धेकडे परिसरातील नागरिकांचे आणि नारळ लढवण्याची कला अवगत असलेल्या स्पर्धकांचे लक्ष लागले आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन या पारंपरिक खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






Subscribe to my channel






