
विकासकामांना कार्यारंभ आदेश देण्याची मागणी; निवासी संकुलांची ऑन कॅमेरा पाहणी आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर सभेत जोरदार चर्चा
मालवण : मालवण नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, बंधाऱ्याच्या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून देणे, शहरातील संभाव्य पाणीटंचाई आणि निवासी संकुलांमधील सांडपाण्याच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. विकासकामांच्या मंजुरीनंतरही कार्यारंभ आदेश देण्यास होत असलेला विलंब, विरोधी नगरसेवकांच्या मागण्या आणि शहरातील मूलभूत सुविधांचे नियोजन या मुद्द्यांवर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडली. शहराच्या विकासासाठी सर्व प्रभागांना समान न्याय मिळावा, तसेच नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी पालिकेच्या सभागृहात ही सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विकासकामांचे कार्यारंभ आदेश कधी मिळणार?
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक मंदार केणी यांनी विकासकामे मंजूर झालेल्या ठेकेदारांकडून तीन महिन्यांपूर्वी अनामत रक्कम भरून घेण्यात आली असतानाही कार्यारंभ आदेश दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणावर निर्णय होईपर्यंत सभा पुढे नेऊ नये, अशी भूमिका घेत त्यांनी सभागृहात खाली बसून न्यायाची मागणी करण्याचा इशारा दिला. यावर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
बंधाऱ्यासाठी जेसीबी न मिळाल्याने तपस्वी मयेकर आक्रमक!
बंधाऱ्याच्या कामासाठी विरोधी नगरसेवकांना जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे प्रशासन काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी स्थानिक विकासकामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होत नसेल, तर कामे मार्गी कशी लागणार, असा सवाल उपस्थित केला. विरोधी नगरसेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करा!
देशभरात निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरासाठी आतापासूनच ठोस नियोजन करण्याची मागणी नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी केली. उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन यावर पालिकेने भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. यावर नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी नळपाणी योजनेवरील बेकायदेशीर जोडण्या काढून टाकल्यास शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असे नमूद केले. त्यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा वाहिन्यांची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
नगरसेवक मंदार केणी यांनी एका निवासी संकुलाच्या बांधकामासाठी धामापूर नळपाणी योजनेचे पाणी विनामूल्य दिले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नावर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी पालिकेच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
निवासी संकुलांची ऑन कॅमेरा पाहणी करा!
मालवण शहरातील निवासी संकुले आणि अन्य बांधकामांना अंतिम मान्यता देताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप भाजप नगरसेवक मंदार केणी यांनी केला. निवासी संकुलांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या समस्येची गंभीर दखल घेऊन शहरातील सर्व निवासी संकुलांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी विशेष सभा बोलावून सर्व निवासी संकुलांची ऑन कॅमेरा पाहणी करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडे सादर केले. या पत्रावर सत्ताधारी गटातील चौदा नगरसेवकांच्या सह्या असल्याचे सांगण्यात आले. निवासी संकुलांना अंतिम मान्यता देताना सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींची काटेकोर तपासणी करण्यात यावी, अशी भूमिका केणी यांनी मांडली.
‘मला दाबण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नाही!’
विकासकामांच्या मंजुरीवरून नगरसेवक सुदेश आचरेकर यांनीही सभेत आक्रमक भूमिका घेतली. विरोधी नगरसेवकांना विकासकामांच्या बाबतीत डावलले जात असल्याचा आरोप करत आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी आवाज उठविणे हा लोकप्रतिनिधी म्हणून आपला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.“मला दाबण्याचा प्रयत्न केल्यास मी गप्प बसणार नाही. माझा इतिहास तपासा!” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी आणि विरोधक असा भेद न करता सर्व प्रभागांना विकासकामांसाठी समान न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या जागेवरील उपसूचना फेटाळली
शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राला भरड येथील पार्किंगच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या विषयावर विरोधी नगरसेवकांनी उपसूचना मांडली होती. मात्र, ही उपसूचना ४ विरुद्ध १५ मतांनी फेटाळण्यात आली. नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी तटस्थ भूमिका घेतली.सभेदरम्यान विरोधी गटाकडून गटनेते महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. तर सत्ताधारी गटाकडून बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण आणि सिद्धार्थ जाधव यांनी आपली बाजू मांडली. यावेळी मेघा गावकर, अश्विनी कांदळकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अनिता गिरकर, अन्वेषा आचरेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, रविकिरण तोरसकर आणि महेश कोयंडे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.







Subscribe to my channel






