आ. नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या ; राणेंनी दिली “ही” प्रतिक्रिया !

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे समर्थकाला अटक

आ. राणेंनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करीत दिली प्रतिक्रिया

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख शिवसेना नेते सतीश सावंत यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोष परब यांच्यावर मागील आठवड्यात अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना हल्ल्यानंतर काही तासातच ईनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर आता आमदार नितेश राणे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन सातपुते नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, राजकीय वादातून आपणाला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

   सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात मुख्य संशयित सचिन सातपुते याला अटक करण्यात आली आहे. सातपुते याला सिंधुदूर्ग पोलिसांनी दिल्लीमधून अटक केल्याचे समजते.सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्याने २०१७ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक भाजपकडून लढविली होती. संतोष परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुते फरार  होता. त्याचा मोबाईलही बंद असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. नितेश राणे यांची याच प्रकरणी कणकवली पोलिसांनी चौकशीही केली आहे. या पाठोपाठ त्यांच्या समर्थकाला अटक झाली आहे.

राजकीय हेतूने मला गोवण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या माध्यमातून लढवली जात आहे. या निवडणुकीत मतदारांचा कल भाजपाच्या दिशेने दिसत असून त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते संतोष परब यांच्या हल्ला प्रकरणात मला गुंतवत असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांमध्ये चुकीच्या केसेस मध्ये राजकिय पक्षाच्या नेत्यांना अडकवण्याचे प्रकार या सरकारकडून सुरू आहेत. असाच अनुभव सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मला येत आहे.
नितेश राणे, आमदार भाजपा
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!