गणपती विसर्जनानंतर निर्माल्य किनारपट्टीवर; अन्वेशा आचरेकरांच्या पुढाकाराने तातडीने स्वच्छता

नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कार्यवाही ; मच्छिमार वर्गाकडून समाधान

मालवण | कुणाल मांजरेकर

गणपती विसर्जनानंतर शहरातील दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा वाहून आल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात हा कचरा अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्याने किनाऱ्यावरील अस्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला होता. ही बाब लक्षात येताच प्रभाग ९ च्या स्थानिक नगरसेविका तथा मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांनी तातडीने दखल घेत पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज दांडी ते बंदर जेटी किनारपट्टीची स्वच्छता करून घेतली. त्यामुळे मच्छीमारांची संभाव्य गैरसोय टळण्यासोबतच पर्यटकांसाठीही स्वच्छ किनारा उपलब्ध झाला आहे.

गणपती विसर्जनानंतर समुद्रात सोडण्यात आलेले निर्माल्य, फुलांचे अवशेष तसेच अन्य कचरा समुद्राच्या लाटांसोबत पुन्हा किनाऱ्यावर वाहून आला. त्यामुळे दांडी बीच व नजिकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. सकाळच्या सत्रात मच्छीमार आपल्या बोटी घेऊन समुद्रात मच्छीमारीसाठी जातात. किनाऱ्याजवळ आणि समुद्राच्या पाण्यात असलेला कचरा जाळ्यात अडकण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांच्या कामात अडथळा निर्माण होण्याची परिस्थिती होती. जाळ्यात कचरा अडकल्यास मच्छीमारीसाठी अतिरिक्त वेळ आणि श्रम खर्ची पडण्याबरोबरच जाळ्यांचे नुकसान होण्याचीही शक्यता असते.

दरम्यान, गणेशोत्सवानंतर दांडी बीचवर पर्यटकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मालवणला येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून भेट देत असल्याने किनारा स्वच्छ आणि कचरामुक्त असणे पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अन्वेशा आचरेकर यांनी विलंब न करता पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून दांडी बीचवरील कचरा हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून साचलेले निर्माल्य व अन्य कचरा हटविला. मच्छीमारांची गैरसोय टाळण्यासोबतच पर्यटकांसाठी दांडी बीच स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने अन्वेशा आचरेकर यांनी घेतलेल्या या तातडीच्या पुढाकाराचे स्थानिकांकडून स्वागत होत आहे.

error: Content is protected !!