राजस्थानच्या रणांगणात प्रमोद जठार; भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी

नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रमोद जठार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती; संघटनात्मक अनुभवाची पक्षश्रेष्ठींकडून दखल

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणातून आता राजस्थानच्या निवडणूक रणांगणात आमदार प्रमोद जठार यांची एंट्री झाली आहे. राजस्थानमधील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कोकण विभागाचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, भरतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजस्थानमधील भाजपच्या निवडणूक रणनीतीत महाराष्ट्रातील अनुभवी नेत्याला स्थान देत पक्षाने जठार यांच्या संघटनात्मक कौशल्यावर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भरतपूरमधील पक्ष संघटना, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी जठार यांच्यावर असणार आहे.

आमदार प्रमोद जठार यांनी भाजपमध्ये विविध स्तरांवर काम करताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. प्रदेश पातळीवरील जबाबदाऱ्यांसह पक्षाच्या विविध भूमिकांमध्ये त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. भाजपचे पक्ष प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर पक्षाची भूमिका आक्रमक आणि प्रभावीपणे मांडताना त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे.

संघटन उभारणीचा अनुभव, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची हातोटी, निवडणूक व्यवस्थापनाचे कौशल्य आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची क्षमता या जमेच्या बाजू लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर राजस्थानची जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे.महाराष्ट्रातील कोकणपासून राजस्थानच्या भरतपूरपर्यंत भाजपच्या संघटनात्मक कामाची धुरा सांभाळण्याची संधी ही आमदार प्रमोद जठार यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाची जबाबदारी मानली जात आहे. भरतपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी जठार यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!