तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी

महायुती सरकारच्या काळातच महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना खरा राजाश्रय – आमदार प्रमोद जठार

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून लोककलावंतांना मिळतेय सन्मानाचे व्यासपीठ

कणकवली : देवदिवाळीच्या निमित्ताने तळकोकणातील समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर कणकवलीत अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी ईली फराळाक येवा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमातून कोकणच्या पारंपरिक लोककलेचा देखणा आविष्कार सादर करण्यात आला.

या सांस्कृतिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली ती कोकणची शान असलेली पारंपरिक दशावतार लोककला. तब्बल ३० कलाकारांनी सहभाग घेत दशावतार कलेचे बहारदार सादरीकरण केले. कलाकारांनी आपल्या अभिनयातून, प्रभावी संवादातून आणि पारंपरिक कलाविष्कारातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून कोकणच्या लोकसंस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडले.

या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थिती लावत कलाकारांचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि कलाकारांना खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळत असल्याचे प्रतिपादन केले.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून लोककलांचे संवर्धन, जतन आणि कलाकारांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कोकणची सांस्कृतिक ओळख असलेल्या दशावतारासारख्या पारंपरिक लोककलांना शासकीय स्तरावर प्रोत्साहन मिळणे ही अभिमानाची बाब आहे, असे आमदार जठार यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालवणी स्टार दिगंबर नाईक आणि श्रुती परब यांनी आपल्या खास मालवणी शैलीत केले. त्यांच्या खुमासदार निवेदनामुळे कार्यक्रमाला अस्सल मालवणी बाज लाभला आणि सांस्कृतिक सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

देवदिवाळीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे कणकवलीत कोकणच्या लोककलेचा, परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा अनोखा उत्सव रंगला. स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ मिळाल्याने या उपक्रमाचे रसिकांकडूनही स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!