गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करा

भरड नाक्यासह प्रमुख ठिकाणी ट्राफिक कंट्रोल अधिकारी नियुक्त करा; मनसेची पोलिसांकडे मागणी

मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात दाखल होण्यास सुरुवात झाली असून, त्यातच पर्यटन हंगामाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने मालवण शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मालवणातील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालवण पोलिसांकडे केली आहे.

मनसे मालवण तालुका सचिव सूरज पुजारे यांनी याबाबत मालवण पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणात चाकरमानी व भाविक मालवण तालुक्यात दाखल होत आहेत. कसाल व कुडाळ मार्गे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असतानाच चौके व कट्टा परिसरातूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दुसरीकडे, पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी पर्यटकांची मोठी वर्दळ सुरू असून, पर्यटक खासगी तसेच सार्वजनिक वाहनांतून मालवणकडे येत आहेत. गणेशोत्सवाची सुट्टी आणि पर्यटकांची गर्दी यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या आणखी वाढली आहे.याचा सर्वाधिक परिणाम मालवण शहर, मालवण-देवबाग तसेच कट्टा आणि चौके मार्गावर होत असून, अतिरिक्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन भरड नाक्यासह इतर प्रमुख नाक्यांवर ट्राफिक कंट्रोल अधिकारी नियुक्त करावेत. तसेच दुचाकीवरून फिरते ट्राफिक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी मनसेने केली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी वेळीच नियोजन केल्यास नागरिक, चाकरमानी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!