राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांसाठी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांशी महत्त्वपूर्ण चर्चा
मुंबई : कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी पुढाकार घेतला आहे. राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी या रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे, या मागण्यांसंदर्भात त्यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची (COM) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान संबंधित स्थानकांवर महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे सुरू करण्याची आवश्यकता, प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित प्रश्न यावर चर्चा करण्यात आली.
कोकण रेल्वे हा या भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, अनेक स्थानकांवर अपेक्षित गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, अशी आग्रही भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी मांडली.
कोकणातील रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




Subscribe to my channel




