दुष्काळसदृश परिस्थितीची ‘ऑन द स्पॉट’ पाहणी; पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी अन् अडचणींची थेट माहिती घेणार; जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे रविवारी, २७ सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार आहेत. जिल्ह्यातील भातशेतीची स्थिती, पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रविवारी सकाळी ९ वाजता मोपा, गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोटारीने सिंधुदुर्गकडे रवाना होतील. या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध भागांना भेट देत ते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे पालकमंत्री राणे भातशेतीच्या पिकांची पाहणी करतील. त्यानंतर ११ वाजता वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथे भेट देऊन पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील. यानंतर दुपारी १२ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दुष्काळसदृश परिस्थितीबाबत महत्त्वाची आढावा बैठक होणार आहे. जिल्ह्यातील शेतीची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि पुढील कार्यवाही याबाबत ते संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत.

दुपारनंतर पालकमंत्री राणे यांचा पाहणी दौरा पुढे सुरू राहणार आहे. दुपारी ३.३० वाजता कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द, सायंकाळी ४.३० वाजता देवगड तालुक्यातील शिरगाव, शेवरे-तांबळवाडी येथे भातशेतीची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथेही पालकमंत्री राणे शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी थेट बांधावर

या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पालकमंत्री नितेश राणे केवळ प्रशासकीय आढावा न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. पिकांची सद्यस्थिती, नुकसानीचे स्वरूप, पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची ते थेट माहिती घेणार आहेत.

प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकाऱ्यांसोबतची आढावा बैठक यामुळे सिंधुदुर्गातील दुष्काळसदृश परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र समोर येण्यास मदत होणार आहे. तसेच नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाला पुढील दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!