सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल; शिरोड्यात ताज हॉटेलचा मार्ग मोकळा

शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी; पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मिळणार मोठी चालना

मुंबई : सिंधुदुर्गवासियांनी तब्बल १९९४ पासून पाहिलेले बहुप्रतिक्षित ताज हॉटेलचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आज त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी झेप मिळण्याची अपेक्षा आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधींमध्ये हा महत्त्वपूर्ण करार झाला. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडी-वेंगुर्लाचे आमदार दीपक केसरकर, IHCLचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल, MTDCचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

शिरोडा-वेळागर येथील प्रस्तावित ताज प्रकल्प हा सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रातील मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. कोकणच्या निसर्गसौंदर्याचा, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांचा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनुभव देश-विदेशातील पर्यटकांना देणारे आलिशान पर्यटन केंद्र म्हणून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. ताजसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रँडचे आगमन झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षमतेला मोठी ओळख मिळण्याबरोबरच जिल्ह्यातील पर्यटन पायाभूत सुविधांमध्येही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा स्थानिक रोजगार आणि व्यवसायनिर्मितीला होणार आहे. हॉटेल क्षेत्रासोबतच वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, जलक्रीडा, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, कृषी उत्पादने, मत्स्यव्यवसाय आणि विविध सेवा क्षेत्रांना यामुळे चालना मिळू शकते. स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांसाठीही मोठी बाजारपेठ निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या विकासातील नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगितले. ताजच्या आगमनामुळे सिंधुदुर्गची आतिथ्य क्षेत्रातील क्षमता वाढेल, स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळतील आणि जिल्ह्याचे नाव भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उमटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गला विस्तीर्ण समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य जंगले, जलमार्ग, समृद्ध कोकणी संस्कृती आणि गोव्याच्या जवळिकीचा मोठा लाभ आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या पर्यटनासाठी सिंधुदुर्गमध्ये प्रचंड क्षमता आहे. शिरोडा येथे ताजसारख्या प्रतिष्ठित ब्रँडच्या प्रकल्पामुळे जिल्ह्यात भविष्यात आणखी मोठ्या पर्यटन गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गवासीयांच्या चर्चेचा आणि अपेक्षेचा विषय ठरलेल्या या प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आजच्या त्रिपक्षीय करारामुळे महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, ताज प्रकल्पाच्या प्रत्यक्ष वाटचालीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांच्या दीर्घकाळच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ताजच्या आगमनामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी ओळख, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!