मंत्री आशिष शेलारांच्या वाढदिवसाच्या आवाहनाला त्यांच्या मूळ नांदोस गावातून कृतीची सलामी..!

टेंबवाडी, चव्हाणवाडी पश्चिम येथे माती बंधारे बांधून जलसंधारणाचा संदेश; मालवण भाजपा, नांदोस उपसरपंच विजय निकम यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांची साथ

मालवण | कुणाल मांजरेकर

संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री, नांदोस गावचे सुपुत्र आशिष शेलार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केले होते. त्यांच्या या आवाहनाला त्यांच्या मूळ गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद देत नांदोस येथे माती बंधारे उभारण्यात आले.

‘सेवा संकल्प अभियान’ आणि आशिष शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुका सरचिटणीस तथा नांदोसचे उपसरपंच विजय निकम यांच्या पुढाकाराने टेंबवाडी तसेच चव्हाणवाडी पश्चिम येथे पाणी अडवण्यासाठी माती बंधारे बांधण्यात आले. पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता जलसंधारणाच्या कामातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आशिष शेलार यांचा संदेश नांदोस ग्रामस्थांनी कृतीतून दिला आहे. शेलार यांच्या आवाहनाला त्यांच्या गावातून मिळालेला हा प्रतिसाद इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, समृद्धी आसोलकर, महेश मांजरेकर, सुमित सावंत, बंडू गावडे, सुशील गावडे, विद्याधर पार्टे, सुहास हडकर, गणेश नलावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!