गोवा बनावट दारूच्या ३५ बॉक्स सह ८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

एकास अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): गोवा – मुंबई महामार्गावर ओसरगाव टोल नाक्या नजीक पांढऱ्या रंगाच्या महिद्रा झायलो कारमधून गोवा बनावटीची दारूचे 35 बॉक्स असा एकूण 8 लाख 69 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करून एकास अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांनी दिली.

गोवा राज्यातून छुप्या पद्धतीने गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याने पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध दारू वाहतुकीवर कठोर निर्बंध आणण्याबाबत सूचना दिली होती. काल रात्री गोवा मुंबई महामार्गावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार रवी इंगळे यांना मिळाली होती.

प्राप्त माहितीनुसार स.पो.नी. महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गोवा ते मुंबई महामार्गावर गस्त घालत होते. ओसरगाव टोल नाक्यानजीक एक संशयित पांढऱ्या रंगाची महिंद्र झायलो कार गोवा दिशेकडून येताना दिसली. कार थांबवून प्राथमिक तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीची दारू असल्याचे निष्पन्न झाले. कणकवली पोलीस ठाण्यात गाडीची रितसर तपासणी करता मॅकडॉवेल्स कंपनीचे 28 बॉक्स व इंपिरीयल ब्लू कंपनीचे 7 बॉक्स असे एकूण 35 दारुने भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स मिळून आले. मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली. त्याच्या विरुद्ध दारूबंदी अधिनियमाद्वारे कारवाई करण्यात आली. ही कारवाई स.पो.नि. महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, प्रकाश कदम, कृष्णा केसरकर, रवी इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!