
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
पर्यटन विकासासह स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देण्याची ना. नितेश राणे यांची ग्वाही
मालवण : सिंधुदुर्गचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि जलमार्ग ही जिल्ह्याची मोठी ताकद असून, या जलसंपदेचा पर्यटन विकासासाठी प्रभावी वापर करण्याची गरज आहे. जलमार्गावरील प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाला नवे आयाम मिळतील, स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसेच किनारपट्टीवरील अर्थकारणाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
मालवण येथे महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी पात्र ठरलेल्या ३५ लाभार्थ्यांना उद्देशपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व लाभार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जलपर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समुद्रकिनारपट्टी जलवाहतुकीने जोडण्याची संकल्पना असून, त्याच दिशेने आजचे उद्देशपत्र वितरण हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उद्देशपत्रांच्या माध्यमातून भविष्यात जलवाहतूक सेवांचा विस्तार होणार असून, पर्यटकांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुलभ प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून भविष्यात आणखी उद्देशपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या सागरी किनारपट्टीच्या विकासासाठी सागरमाला उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ व बंदर विभागाच्या माध्यमातून सागरी मंडळाच्या जमिनीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने परवाना देऊन नियमित करण्यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना स्थैर्य मिळणार असून किनारपट्टीवरील आर्थिक व्यवहारांना बळकटी मिळेल, असे पालकमंत्री म्हणाले.
जलपर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना – आमदार निलेश राणे
आमदार निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलपर्यटनाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे. मालवणसह संपूर्ण जिल्ह्यात जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने पर्यटन व्यवसायाला नवी दिशा मिळणार आहे. मत्स्यव्यवसाय, पर्यटन, स्थानिक सेवा क्षेत्र आणि लघु व्यवसायांशी संबंधित अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या उपक्रमामुळे किनारपट्टीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
बंदर व मत्स्यव्यवसाय विभागात ९०० नवीन रोजगाराच्या संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमध्ये रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागासाठी ४५० पदे तर बंदर विभागासाठी ४५० नवीन पदांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लाभार्थी, पर्यटन व जलवाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Subscribe to my channel






