मालवण पोस्ट ऑफिसमध्ये उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशीही आधार अपडेटचे काम सुरु राहणार

दोन मशीन उपलब्ध ; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय, आ. निलेश राणेंचा पुढाकार

मालवण | कुणाल मांजरेकर 

मालवण शहरात आधार अपडेट करण्यासाठी नगरपालिकेत एकच मशीन उपलब्ध असल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. याची माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवणसाठी तात्पुरत्या स्वरूपात आणखी एक मशीन देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या रविवारी पोस्ट ऑफिसमध्ये सुट्टीच्या दिवशी देखील दोन मशीन द्वारे आधार अपडेटचे काम सुरु राहणार आहे. यावेळी केवळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट प्राधान्याने करून दिले जाणार आहे.

दहावी आणि बारावीचे परीक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरु असून त्यासाठी आधारकार्ड अपडेट असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना आधारकार्ड अपडेट करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र मालवण शहरात केवळ नगरपालिकेत एका मशीनवर आधार अपडेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे दिवसाला जास्तीत जास्त ५० जणांचे आधार कार्ड अपडेट केले जातात. त्यात विद्यार्थ्यां व्यतिरिक्त अन्य नागरिक देखील आधार अपडेट साठी उपस्थित असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

याची माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह शिष्टमंडळाने पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर शिवराज खोत यांची भेट घेऊन ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील दूरध्वनी वरून लक्ष वेधून मालवण पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असलेल्या मशीन द्वारे आधार अपडेटचे काम तात्काळ सुरु करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली. यावेळी भाई मांजरेकर, शिवाजी केळूसकर, कमलाकर कोचरेकर, राजू बिडये, अभय कदम, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणात आणखी एक आधार अपडेट ची मशीन उपलब्ध करण्यात आली असून रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये आधार अपडेट चे काम करून दिले जाणार आहे. ही व्यवस्था केवळ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून याचा संबंधित विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!