मच्छीमार प्रतिनिधींनी आ. नितेश राणे यांचे मानले आभार…

मालवण | कुणाल मांजरेकर : देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय प्रस्तावित असून या महाविद्यालयाची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची घोषणा आमदार नितेश राणे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या मत्स्य महाविद्यालयाच्या घोषणेचे मच्छीमार वर्गातून स्वागत केले जात असून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ओरोस या ठिकाणी आ. नितेश राणे यांची मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी मत्स्य महाविद्यालयासाठी त्यांचे आभार मानण्यात आले.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून फक्त रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय आहे. वाढत्या मत्स्य व्यवसायाचा विचार केला असता भविष्यात मोठ्या प्रमाणात मत्स्यक्षेत्रातील तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या या मत्स्य महाविद्यालयामुळे स्थानिक प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होणार आहे. तसेच मत्स्य व्यवसायास बळकटी मिळणार आहे. सदर महाविद्यालय सिंधुदुर्गात होण्यासाठी आ. नितेश राणे यांनी राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा केला. यामुळेच मत्स्य महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी आ. नितेश राणे यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे. या भेटीवेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा महिला मच्छीमार सहकारी संस्था अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर, दांडी येथील पारंपारिक मच्छीमारांचे प्रतिनिधी नारायण धुरी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सदरचे मत्स्य विद्यापीठ कोणत्याही परिस्थितीत नागपूर स्थित मत्स्य विद्यापीठास(माफसू) न जोडता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनाच संलग्न राहावे अशी आग्रही मागणी यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!