वराड येथे २३ मे रोजी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा

मालवण : दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे? असा यक्षप्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर उभा राहतो. याच प्रश्नाचे योग्य उत्तर व दिशा मिळवून देण्यासाठी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’ यांच्या वतीने शनिवार दि. २३ मे रोजी दुपारी ३ वाजता हडपीवाडी वराड येथील ‘नम्रता हॉल’ येथे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे.

यावेळी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारत सरकारचे वरिष्ठ अनुवाद अधिकारी (केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई) सत्यवान रेडकर हे उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींवर मार्गदर्शन करतील. तसेच, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून प्रेरणा मिळावी यासाठी अनुभव कथन या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई येथील डॉ. जान्हवी लाड (MBBS) आणि सिंधुदुर्ग पोलीस दलातील करिश्मा चिंदरकर या आपल्या प्रवासाविषयी आणि यशाविषयी संवाद साधणार आहेत.

“योग्य मार्गदर्शन… उज्ज्वल भविष्याची हमी !” हे ब्रीद घेऊन आयोजित केलेल्या या सुवर्णसंधीचा वराड व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन सेवास्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!