महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई ; यानंतरही सातत्याने कारवाई सुरु राहणार


मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत मासेमारी रोखण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला दिले आहेत. त्यानुसार सोमवारी ८ सप्टेंबरला सायंकाळी मालवण समोरील समुद्रात बेकायदा मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील तीन पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यात आली आहे
मालवण समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील असलेल्या पर्ससीन नौका सफा मारवा ३ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२६२, नौका अब्दुल लतिफ नॉ. क्र. IND-MH-४-MM-५२००, व नौका जलसफा २ नों.क्र.- IND-MH-४-MM-६००५ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अंदाजे ७ ते ८ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या पर्ससीन नेटव्दारे मासेमारी करत असताना पकडले. या तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण अंदाजे ५५-६५ खलाशी आहेत. सदर नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणाऱ्या मासळीचा लिलाव दि.०९/०९/२०२५ रोजी सकाळी करण्यात येणार आहे. तसेच सदर नौकांना प्रत्येकी एक लक्ष दंड होण्याची शक्यता आहे.
अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा मासेमारी वर कारवाईचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले असून यानंतरच्या कालावधीत देखील अशा प्रकारची कारवाई सातत्याने केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिली आहे.

Subscribe to my channel




