
स्वच्छता विभागात कार्यरत असलेले जेसीबी, ट्रॅक्टर आणि घंटागाड्या विना नंबर प्लेट रस्त्यावर

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांची नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर नाराजी
मालवण : मालवण नगरपालिका प्रशासनाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. देऊळवाडा, आडारी आणि आंगणेवाडी मुख्य रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडमधील घाण थेट रस्त्यावर पसरल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केला आहे.
बाबी जोगी यांनी प्रशासनाला धारेवर धरताना म्हटले की, आंगणेवाडी मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक आणि भाविक ये-जा करत असतात. मात्र, डम्पिंग ग्राउंडमधील कचरा आणि घाण रस्त्यावर पसरल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर डम्पिंग ग्राउंडची हीच अवस्था असेल, तर नगरपालिका दरवर्षी स्वच्छतेच्या नावाखाली एवढा मोठा निधी कशासाठी आणि कुठे खर्च करते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या कचरा कोंडीसोबतच मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील आणखी एक मोठा बेकायदेशीर कारभार जोगी यांनी उघडकीस आणला आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेले जेसीबी, ट्रॅक्टर आणि घंटागाड्या चक्क विना नंबर प्लेट शहरात फिरत आहेत. वाहतुकीचे नियम सर्वसामान्य जनतेसाठी कडक असताना, पालिकेच्या कंत्राटदाराला हे नियम लागू नाहीत का संबंधित कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची बिले दिली जातात. मग या बेकायदेशीर गोष्टींवर पालिकेचा अंकुश का नाही? कंत्राटदाराला पाठीशी घालणारी ती ‘अदृश्य शक्ती’ नगरपालिकेत कोण आहे? म्हणूनच कंत्राटदार इतका बिनधास्तपणे विना नंबर प्लेटच्या गाड्या चालवत आहे,” असा थेट आरोप जोगी यांनी केला.या सर्व ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण? असा खडा सवाल उपस्थित करत, जोगी यांनी नगरपालिका प्रशासनाला तात्काळ डम्पिंग ग्राउंडची स्वच्छता करणे आणि विना नंबर प्लेटच्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टी आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबला नाही, तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.





Subscribe to my channel






