“याठिकाणी” चक्क डॉक्टर शिवाय सुरू आहे ग्रामीण रुग्णालय !
सिंधुदुर्गात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा : जिल्हा आरोग्य विभाग लक्ष देणार का ?
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात तर चक्क डॉक्टरविना ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू असून हे ग्रामीण रुग्णालयच सध्या व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर नसून आरोग्यसेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. गेले चार दिवस डाॕक्टरशिवाय रुग्णालय सुरू असून या रुग्णालयाकडे आरोग्य विभाग लक्ष देणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या काळात या रुग्णालयात तीन डॉक्टर कार्यरत होते. तिन्ही डॉक्टर हे कंत्राटी म्हणून काम करत होते. यातील दोन डॉक्टर परराज्यातील होते. त्यांना गेली सहा महिने पगार न मिळाल्याने त्यांनी राजीनामा देत गाव गाठले. तर कार्यरत असलेले तिसरे डॉक्टर हे रजेवर गेले आहेत. रुग्णालयात रुग्ण हेलपाटे मारत आहेत. उपचाराविना रुग्ण माघारी फिरत आहेत. रुग्णालयात सर्पदंशावरील औषधे असून देखील रुग्णांना पुढे पाठविले जात आहे. या गोंधळात रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे. मंगळवारी कुसुर येथील एक सर्पदंशाचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. परंतु कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर नसल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्या रुग्णाला येथील खाजगी दवाखान्यात नेले. खाजगी दवाखान्यात औषध नव्हती. दरम्यान हतबल झालेल्या नातेवाईकांना माजी नगरसेवक संजय सावंत यांनी धीर दिला. व तात्काळ १०८ रुग्णवाहिका उपलब्ध केली. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रुग्णाला कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या नातेवाईकांनी संजय सावंत यांचे आभार मानले. बुधवारी सोनाळी येथील तरुणाने आत्महत्या केली. त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून दुपारी डाॕक्टर बोलविण्यात आले. ते ही फक्त एका दिवसा पुरते ! अशावेळी या ग्रामीण रुग्णालयाला वाली कोण ? असा संतप्त सवाल नागरीकांकडून विचारला जात आहे. तालुक्यातील अपघातातील रुग्ण, संर्प दश झालेले रुग्ण व अन्य गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाही तर त्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे.
वैभववाडी ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील गोरगरीब जनतेला वैदयकीय सेवेसाठी मोठा आधार आहे. मात्र रुग्णायातील वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना वैदयकीय सेवा मिळण्यात अडचण होत आहे. सध्या रुग्णालयात प्रयोग शाळा तंञज्ञ, एक्सरे तंञज्ञ उपलब्ध आहेत. तंञज्ञ आहेत पण डाॕक्टरच नाही. तर रुग्णांवर उपचार तरी होणार कसे ?
डाॕक्टरांप्रमाणेच औषध निर्माता हे पदही रीक्त असून सध्या हे काम रुग्णालयातील आरोग्य सेविकांनाच करावे लागत आहे. तसेच सफाई कामगार व अन्य पद ही रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयातील डाॕक्टर व अन्य रिक्त कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.