केंद्र सरकारच्या प्राकृतिक पेंट प्रकल्प प्रशिक्षणासाठी वैभववाडीच्या युवकाची निवड
देशातील निवडक २५ व्यक्ती होणार सहभागी : २२ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे प्रशिक्षण
वैभववाडी : केंद्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्राकृतिक पेंट (गाईच्या शेणापासून) प्रकल्प प्रशिक्षणासाठी वैभववाडीच्या युवकाची निवड झाली आहे. अभिजित उर्फ राजू पवार असे या युवकाचे नाव आहे. तो वैभववाडीतील एडगावचा सुपूत्र आहे. या प्रशिक्षणासाठी देशातुन निवडक २५ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. राजु पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सोमवारी २२ नोव्हेंबर पासून हे प्रशिक्षण जयपूर राजस्थान कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिमित्त कागद संस्था येथे होणार आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बदलण्यास हा प्रकल्प महत्वपूर्ण भुमिका बजावणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे नैसर्गिक रंगांची उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. गाईच्या शेणा पासून तयार होणारा रंगाचा हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होत आहे. या प्रकल्पासाठी लागणारे गाईंचे शेण हे शेतकऱ्यांकडून ५ रुपये किलोने विकत घेतले जाणार आहे. किंबहुना शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या आशिर्वादाने श्री. पवार यांची निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रशिक्षणासाठी निवड होण्यासाठी आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अमोल गवळी, तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्रचे सीईओ संजय यादव यांचे मार्गदर्शन लाभले.