पंचक्रोशीत १५०० वृक्ष लागवड करणार ; २० जून रोजी शुभारंभ
मालवण | कुणाल मांजरेकर
सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक ऋतू चक्रावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून कट्टा – वराड येथील रक्तदान व सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘आभाळमाया’ ग्रुपने पुढाकार घेतला असून पंचक्रोशीत १५०० वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २० जूनला या वृक्षारोपण उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे.
आभाळमाया ग्रुप रक्तदान चळवळीसाठी जिल्ह्यात नावाजलेला आहे. आजवर हजारो रुग्णांना ग्रुपच्या माध्यमातून रक्त पुरवठा करण्यात आला आहे. अन्य सामाजिक क्षेत्रात देखील आभाळमाया ग्रुपचे मोठे काम आहे. आता वृक्ष लागवडीसाठी आभाळमाया ग्रुपने पुढाकार घेतला आहे. कट्टा, वराड, नांदोस, तिरवडे, गुरामनगरी, पेंडूर येथील मंदिर परिसरात वृक्ष लागवड तसेच जंगल भागात जंगली वृक्ष, पर्यटनाच्या दृष्टीने गुलमोहर आणि बहावाची मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या गर्मीत थंडावा ठेवतील असे वड, पिंपळ, फळझाडे अशी एकूण १५०० वृक्ष लागवड करण्याचा आणि पुढील पाच वर्ष त्याचे संगोपन करण्याचा संकल्प आभाळमायाने केला आहे.