
सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहाराची जबाबदारी; ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला दिले बळ
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबी मुक्त भारत अभियानाला’ बळ देत सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १२५ गरजू उपचारित क्षयरुग्णांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकत्व स्वीकारले असून, या सर्व रुग्णांना सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
क्षयरोगाच्या उपचारात औषधांसोबत सकस व प्रथिनयुक्त आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेक रुग्णांना पुरेसा पोषण आहार मिळत नाही. ही गरज लक्षात घेऊन नितेश राणे यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून हा उपक्रम हाती घेतला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते लाभार्थी रुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले.निक्षय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना एकाचवेळी पोषण आहार उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणारा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. उपचारांसोबत पोषणाची गरज पूर्ण झाल्याने रुग्णांच्या आरोग्य पुनर्वसनाला मोठी मदत होणार असून, ‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’च्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, ‘टीबी मुक्त भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. संजय केसरे, डॉ. राजेंद्र पाताडे, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. जी. टी. राणे, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. मिलिंद नार्वेकर तसेच केमिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
क्षयरुग्णांचा शोध, उपचार, समुपदेशन आणि उपचारांचा सातत्याने पाठपुरावा करण्यामध्ये खासगी डॉक्टर व केमिस्ट प्रतिनिधींनी दिलेल्या योगदानाची यावेळी दखल घेण्यात आली.शासन, आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या अभियानाला या उपक्रमामुळे नवी गती मिळणार आहे. १२५ रुग्णांचे सहा महिन्यांसाठी पालकत्व स्वीकारत नितेश राणे यांनी ‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’साठी आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.






Subscribe to my channel






