
महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पीडित महिलांचा प्रश्न मांडणार
मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कर्मचारी व इतरांकडून झालेल्या कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, आतापर्यंत सुमारे १२० मच्छीमार महिला व इतर नागरिकांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तब्बल नऊ किलोपर्यंत सोने वित्तीय संस्थेत अडकले असल्याची माहिती पीडितांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पीडितांच्या पुढील कायदेशीर लढ्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी धुरीवाडा-मालवण येथील संस्कार हॉलमध्ये बैठक घेण्यात आली.
या बैठकीस भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर उपस्थित राहिल्या. त्यांनी पीडित मच्छीमार महिला व इतर नागरिकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेत त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यावेळी बोलताना श्वेता कोरगावकर यांनी, महिलांसोबत झालेल्या या फसवणुकीच्या प्रकरणाकडे आपण गांभीर्याने पाहत असून, एक महिला म्हणून पीडित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असे आश्वासन दिले. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय महिला आयोगाकडे दाद मागण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रकरणातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पीडितांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळणे आणि त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीनंतर श्वेता कोरगावकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक नयोमी साटम यांची भेट घेतली आणि प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती जाणून घेतली.
दरम्यान, या प्रकरणात अद्यापही अनेक नागरिक तक्रार नोंदविण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रकरणातील पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा गटनेत्या व महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, पूजा सरकारे, श्रमजीवी रापण संघाचे दिलीप घारे, मुख्य तक्रारदार व कोळंब सरपंच सिया धुरी, कविता मोंडकर, रुपेश प्रभू, दाजी जोशी, माधुरी प्रभू, कायदेशीर सल्लागार तसेच बहुसंख्य पीडित मच्छीमार महिला व नागरिक उपस्थित होते. पीडित महिलांनी मालवण येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण प्रकरणाला ताकद देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल श्वेता कोरगावकर यांचे आभार मानले.






Subscribe to my channel






