
अंजली लॉजसमोरील अपघातात खानोलकर यांच्यासह चौघे जखमी; ग्रामीण रुग्णालयात उपचार
तरुणाईच्या वेगाला पोलिसांचा गतिरोधक आवश्यक ; अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर
मालवण : शहरातील अंजली लॉजसमोरील रस्त्यावर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता झालेल्या मोटरसायकल अपघातात भाजप नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांना दुखापत झाली आहे. रॉक गार्डनच्या दिशेने शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने खानोलकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत खानोलकर यांच्यासह धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोन युवती आणि अपघात टाळण्याच्या प्रयत्नात असलेला अन्य एक युवक जखमी झाला.
आमदार निलेश राणे यांच्या हस्ते चिवला बीच येथे शहरातील विकासकामांची भूमिपूजने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी खानोलकर जात असताना रॉक गार्डनकडून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, खानोलकर तसेच दुचाकीवरील दोन्ही युवती रस्त्यावर फेकल्या गेल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करणारा अन्य एक युवकही अपघातात जखमी झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अंजली लॉजचे मालक मयेकर यांनी तत्काळ मदत करत सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. खानोलकर यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. अन्य तिन्ही जखमींवरही उपचार सुरू होते.
अपघाताची माहिती मिळताच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक ललित चव्हाण, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महिमा मयेकर, भाई कासवकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी खानोलकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेत अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
तरुणाईच्या वेगाला पोलिसांचा गतिरोधक आवश्यक!
अंजली लॉजसमोरील रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर शहरातील वाढत्या वेगवान आणि निष्काळजी वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी काही तरुणांकडून वेगाने वाहने चालविल्याच्या घटना वारंवार निदर्शनास येत असल्याने पोलिसांकडून प्रभावी वाहतूक नियंत्रण आणि कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच ०७ ए क्यू ७४३५ क्रमांकाची टीव्हीएस दुचाकी चालविणाऱ्या युवतीचा वेग अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातापूर्वी संबंधित दुचाकीने दोन वाहनांना हूल दिल्याचेही समजते. त्यानंतर ही दुचाकी भाजप नगरसेविका महानंदा खानोलकर यांच्या ताब्यातील दुचाकीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की खानोलकर यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेनंतर संबंधित युवतीची दुचाकीही फेकली गेली. या अपघातात सौ. खानोलकर जखमी झाल्या.
मालवण शहरात विशेषतः रात्रीच्या वेळेत वेगाने व निष्काळजीपणे वाहने चालविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त, वेग तपासणी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुणाईचा उत्साह आणि वाहनांचा वेग रस्त्यावर इतरांच्या जीवितासाठी धोका ठरू नये, यासाठी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाचा ‘गतिरोधक’ आता आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.







Subscribe to my channel






