सिंधुदुर्गातील शेतजमिनींच्या व्यवहारांची चौकशी करा; मनसेची मागणी

शेतकरी नसलेल्या व्यक्तींकडून जमीन खरेदी आणि शेतकरी प्रमाणपत्रांच्या संभाव्य गैरवापराची तपासणी करण्याची मागणी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शेतकरी नसलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्तींकडून शेतजमिनींच्या मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जमीन खरेदीसाठी वापरण्यात आलेली शेतकरी प्रमाणपत्रे, महसूल कागदपत्रे आणि संबंधित व्यवहारांची वैधता तपासावी. तसेच संशयास्पद व्यवहारांमध्ये कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

५ ते १० वर्षांतील व्यवहार तपासण्याची मागणी

मागील ५ ते १० वर्षांतील संशयास्पद शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारांची तालुकानिहाय तपासणी करावी. शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी खरेदी केलेल्या शेतजमिनींची स्वतंत्र यादी तयार करून संबंधितांचा शेतकरी दर्जा आणि तो प्राप्त करण्याचा आधार तपासावा. जमीन खरेदीच्या वेळी सादर करण्यात आलेली शेतकरी प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे, ८-अ, फेरफार नोंदी, खरेदीखत तसेच इतर महसूल अभिलेखांची परस्पर पडताळणी करण्यात यावी, असेही मनसेने म्हटले आहे.

जमीन खरेदीमागील उद्देश तपासा

मोठ्या प्रमाणावर शेतजमीन खरेदी केल्यानंतर तिचे भूखंड पाडणे, बिगरशेती वापर करणे अथवा व्यावसायिक वापरासाठी रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचीही चौकशी करावी. संबंधित खरेदीदाराने यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात किंवा राज्यात शेती केली होती आणि त्याच्या नावावर पूर्वी शेतजमीन होती का, याचीही पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली विशेष महसूल तपासणी पथक स्थापन करून तालुकानिहाय चौकशी मोहीम राबवावी, चौकशीत चुकीची माहिती, अवैध कागदपत्रे किंवा महसूल अभिलेखांमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच जमीन व्यवहारांमध्ये महसूल अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची अनियमितता आढळल्यास संबंधितांची विभागीय चौकशी करावी, प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, मनविसे उपविभाग अध्यक्ष विलेपार्ले अभिजीत मेथर, प्रथमेश धुरी, तालुका सचिव सूरज पुजारे, प्रसाद परब आणि प्रितेश सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!