पाणीटंचाईच्या बैठकीवरून वैभव नाईकांची राजकीय फडफड; दत्ता सामंतांचा घणाघाती हल्लाबोल

“दहा वर्षांचा हिशेब द्या, उगाच तारखांच्या बदलाचा बाऊ करू नका”

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठकीच्या नियोजनावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “दुष्काळावर राजकारण करण्यापूर्वी वैभव नाईक यांनी आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीचा हिशेब जनतेसमोर मांडावा. बैठकीच्या तारखांमध्ये बदल झाला म्हणून बिनबुडाच्या टीकेचा धुरळा उडवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाचा हिशेब द्यावा,” अशा शब्दांत सामंत यांनी नाईक यांच्यावर निशाणा साधला.

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटात शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी, सरसकट पंचनाम्यांसाठी प्रशासनाला निर्देश आणि पाणीटंचाईवरील उपाययोजनांचा पाठपुरावा सुरू असताना, बैठकीच्या तारखांवरून राजकारण करण्याची वैभव नाईक यांना गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दहा वर्षे काय केले, याचे उत्तर द्या!

वैभव नाईक यांच्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामंत म्हणाले, “दहा वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विकासकामांचा किती वेग वाढवला, जनतेचे प्रश्न किती सोडवले आणि आमसभा किती प्रभावीपणे घेतल्या, याचे उत्तर आधी द्या. आज बैठकीच्या तारखांवरून आवाज उठवणाऱ्यांनी स्वतःच्या कार्यकाळातील कामगिरीचाही हिशेब द्यायला हवा.”

आमदार निलेश राणे यांच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांना गती मिळाली असून, दोन तालुक्यांच्या आमसभा घेण्यात आल्या आणि शेकडो कोटींचा निधी मतदारसंघात आणल्याचे सामंत म्हणाले. नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीचा दाखला दिला.

बैठक पुढे ढकलली; पण जनतेची कामे थांबलेली नाहीत!

मालवण तालुक्याची पाणीटंचाई आढावा बैठक शनिवार, १० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व वित्त विभागाच्या बैठकीमुळे नियोजनात बदल झाल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. मात्र, पंचनामे आणि प्रशासनाची कार्यवाही सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. “बैठकीची तारीख बदलली म्हणजे प्रशासन ठप्प झाले, असा अर्थ होत नाही. तारखेच्या बदलाचा राजकीय मुद्दा बनवण्याऐवजी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कशी मिळेल, यावर बोला,” असा थेट सल्ला सामंत यांनी नाईक यांना दिला.

जनतेला आरोपांची नव्हे, कामाची अपेक्षा

निलेश राणे आमदार होण्यापूर्वीही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले. “वैभव नाईक यांनी प्रत्येक प्रशासकीय घडामोडीत राजकारण शोधण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणती मदत मिळवून दिली, हे सांगावे. केवळ टीका करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. आरोपांच्या फैरी झाडण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून उत्तर द्यावे,” असा घणाघात दत्ता सामंत यांनी केला.

error: Content is protected !!