छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणात अध्यासन केंद्र

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांची माहिती ; शासनाकडून निधी मंजुर

मुंबई : सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठा अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिलेल्या आश्वासनाला आता शासकीय मान्यता लाभली असून या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार आहे. हे अध्यासन मालवणात स्थापन होणार आहे.

या निधीमधून सिद्ध होणारे अध्यासन केंद्र ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण अशा बहुआयामी उपक्रमांसाठी कार्य करणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागातील ऐतिहासिक दाखल्यांचा सखोल अभ्यास होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन हातभार लावेल, असा विश्वास अ‍ॅड. शेलार यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५८ वर्षे १२ एप्रिल २०२५ ला पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या गडावरील सांस्कृतिक कार्यक्रमात अँड शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली होती. पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप प्रदेश सचिव प्रमोद जठार, भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याबाबत मालवण मधील या विषयाच्या तज्ञाना घेऊन सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याचा अभ्यास करून शासनाने या अध्यासनाची रचना केली आहे. 

सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चार किल्ल्यांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात अजूनही माहिती जनतेसमोर येणं आवश्यक आहे, अजूनही या किल्ल्याबद्दलचा अभ्यास होणं आवश्यक आहे. या विषयासंदर्भात सर्व कागदपत्र जमा करावे लागतील आणि त्यावर अभ्यास करावा लागेल. व्यापाराचं बेट याठिकाणी होतं, त्याबाबातचे ऐतिहासिक दस्तावेज आहेत. म्हणून संस्कृतिक विभागाकडून मुंबई विद्यापिठाला सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक अध्ययन केंद्राची आवश्यकता होती त्याला मुर्त स्वरूप देत त्यासाठी आवश्यक असणारा ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

error: Content is protected !!