मालवणात बीच लोककला महोत्सवाचे उद्घाटन; नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ

पहिल्या दिवशी दशावतार नाट्यप्रयोग; आमदार निलेश राणे यांची कार्यक्रमस्थळी भेट

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘बीच लोककला महोत्सवा’चे उद्घाटन शनिवारी (ता. १०) सायंकाळी मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते झाले. मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक वारसा नागरिकांसह पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने शनिवार, १० आणि रविवार, ११ ऑक्टोबर रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. रविवारी विविध स्थानिक लोककला पथकांकडून पारंपरिक कलांचे सादरीकरण होणार आहे.

लोककलांच्या संवर्धनासाठी महोत्सव महत्त्वाचा

उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले. कोकणातील पारंपरिक लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मालवणकरांसह पर्यटकांनाही कोकणच्या लोकसंस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लोककला व लोकपरंपरांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यक्रम समन्वयक प्रणय तेली यांनी प्रास्ताविकातून दिली.

महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आमदार निलेश राणे उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रम समन्वयक प्रणय तेली यांच्याशी काही काळ चर्चा केली. त्यानंतर उदघाटन न करताच ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे आणि माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे देखील त्यांच्यासोबत निघून गेले.

उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, मेघा गावकर, चित्रा हरमलकर आदी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार दिव्या सावंत यांनी केला, तर सूत्रसंचालन कोमल शेट्ये यांनी केले. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विविध स्थानिक लोककला पथकांना सादरीकरणाची संधी मिळणार असून, या माध्यमातून कोकणच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

error: Content is protected !!