मालवणच्या जेटीवर रंगणार महिलांचा ‘नारळ संग्राम’!

मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाकडून नारळी पौर्णिमेनिमित्त सलग अकराव्या वर्षी धमाकेदार स्पर्धा जाहीर : २७ ऑगस्टलाला आयोजन

फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ, विम्यासह ९ ग्रॅम सोन्याचा हार जिंकण्याची संधी

मालवण : नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रपूजन, कोळी संस्कृती आणि मालवणी परंपरेचा उत्सव! याच उत्सवाला महिलांच्या उत्साहाची आणि स्पर्धात्मक रंगत देण्यासाठी मालवण बंदर जेटीवर मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाने सलग ११ व्या वर्षी महिलांसाठी ‘नारळ लढविणे’ स्पर्धा जाहीर केली आहे. गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी मेन गेट, कस्टम ऑफिसशेजारी हा भव्य सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी हॉटेल राजभोग येथे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

२०१६ पासून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेची लोकप्रियता वर्षागणिक वाढत आहे. यंदाही नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेला सुरुवात होणार असून, विजेतेपदासाठी महिलांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

नृत्य, जादूचा शो आणि लकी ड्रॉचीही धमाल!

नारळ लढविण्याच्या स्पर्धेसोबतच यंदाच्या कार्यक्रमात मनोरंजनाचीही खास मेजवानी असणार आहे. जिल्ह्यातील नामवंत नृत्य कलाकारांकडून कोळी नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार असून, जादूगार निखिल यांचा जादूचा शो हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या महिला-भगिनींना सामाजिक संदेश असलेली कुपने देण्यात येणार आहेत. या कुपनमधून लकी ड्रॉ काढून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना मंडळाच्या वतीने नारळ मोफत देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी महिलांना आर्या हेल्थ क्लबतर्फे तीन दिवसांचे ऑनलाइन मोफत ट्रायल आणि आरोग्यविषयक मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

बक्षिसांचे सादरीकरण उत्साहात

या वर्षीच्या स्पर्धेतील बक्षिसांचे सादरीकरण हॉटेल राजभोग, बंदर जेटी येथे करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, सदस्य देवानंद लुडबे, शुभदा पाडगावकर, रेश्मा खंदारे-नागवेकर, आर्या मुणगेकर, कोळंब सरपंच सिया चेतन धुरी, वायरी उपसरपंच प्राची पराग माणगावकर, स्नेहल मेथर, मंडळाच्या सल्लागार नोटरी वकील अमृता मोंडकर, रुद्राक्ष कांदळकर, अवनीश मेथर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘नारळ लढवा, परंपरा जपा आणि बक्षिसांची संधी साधा!’ असा उत्साहाचा माहोल निर्माण करणाऱ्या या स्पर्धेत महिला-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!