
मनसेने वेधले लक्ष : ४८ तासात प्रशासनाने पाहणी करून सात दिवसांत लेखी अहवाल देण्याची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधून पाइपलाइनद्वारे थेट सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणी मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग आणि मालवण नगरपालिकेकडे लेखी निवेदन देऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. निवेदन प्राप्त झाल्यापासून ४८ तासांत पाहणी करून सात दिवसांत कारवाईचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चिवला समुद्रकिनाऱ्यावर सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनद्वारे विसर्ग होत असल्याचे दृश्य पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणण्यात आले आहेत. संबंधित विभागांनी घटनास्थळी पाहणी करून या आरोपांची खातरजमा करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
काँक्रीट रस्त्याच्या कामापूर्वी तपासणीची मागणी
संबंधित पाइपलाइनच्या मार्गावर लवकरच काँक्रीटचा रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यामुळे काम सुरू होण्यापूर्वी संबंधित ठिकाणांची पाहणी करून सांडपाणी व्यवस्थेची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मालवणमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात आहे का, याचीही तपासणी करावी, असे मनसेने म्हटले आहे. सांडपाण्यामुळे पर्यावरण किंवा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मनसेच्या प्रमुख मागण्या
पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग आणि मालवण नगरपालिकेने समन्वयाने घटनास्थळी जाऊन ४८ तासात पाइपलाइनची तपासणी करावी. समुद्रकिनाऱ्यावर थेट सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळल्यास तो विसर्ग तातडीने बंद करावा. संबंधित आस्थापनांच्या सांडपाणी व्यवस्थापनाची तपासणी करून नियमभंग आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. पाइपलाइनची तपासणी, दुरुस्ती किंवा हटविण्याची कार्यवाही रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी करावी. पाहणी आणि कारवाईचा अहवाल निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांत द्यावा. समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी सांडपाणी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी. निर्धारित कालमर्यादेत पाहणी आणि आवश्यक कारवाई न झाल्यास वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित सक्षम प्राधिकरणांकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.







Subscribe to my channel






