आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मकतेच्या दिशेने एक पाऊल
मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणात महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महिलांसाठी खास योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर, शांत मन आणि उत्साही जीवनशैलीचा संदेश या शिबिरातून देण्यात येणार आहे. हे योग शिबीर सकाळी ७ ते ९ या कालावधीत होणार आहे. पहिल्या नोंदणी करणाऱ्या ३० महिलांना या योगा क्लासमध्ये मोफत सहभागी होता येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कचेरी रोड येथील फातिमा कॉन्व्हेंट समोर नव्याने सुरु होत असलेल्या तालुका कार्यालयात रविवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता नोंदणीचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. तरी मालवणमधील महिलांनी या आरोग्यदायी आणि उपयुक्त उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केले आहे.