देवेंद्र फडणवीस यांचा “मास्टरस्ट्रोक” ; एकनाथ शिंदे होणार नवीन मुख्यमंत्री

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न फडणवीसांनी केले पूर्ण

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया ; मोदी, अमित शहा यांचेही मानले आभार

कुणाल मांजरेकर

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस नवीन मुख्यमंत्री होणार, अशी शक्यता गृहीत धरली जात असतानाच शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री होतील, असे जाहीर करीत देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. स्वतःजवळ १२० आमदार असूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि १६ अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला. या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!