जिल्ह्यातील दूध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ; आदर्श दूध संस्था पुरस्कार वितरित करण्याची घोषणा, विजेत्या संस्थेला आकर्षक बक्षीस

ओरोस : दूध उत्पादक संस्थांनी व्यवसाय वाढीसाठी संकल्प करून दूध व्यवसायात बदल घडवून आणला पाहिजे. यामध्ये शेतकरी व दूध संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. गोकुळचे योगदान विसरता येणार नाही, त्यांनी गेली १३ वर्षे नुकसान सहन करत जिल्ह्यात सेवा दिली आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग आहे असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी ओरोस येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक दूध उत्पादक संस्थांची जिल्ह्यातील दूध उत्पादनवाढ नियोजनासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा बँक व गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते. मनीष दळवी पुढे म्हणाले की, दूध उत्पादकांबरोबर संवाद करण्याची चळवळ सुरू करून संस्थांप्रमाणे शेतकऱ्यांचेही वर्गीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नवीन पिढीला या व्यवसायामध्ये आणायचे असेल तर पूरक व्यवसायांची जोड द्यायला हवी. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग दिसून येत आहे ही समाधानाची बाब आहे.

यावेळी त्यांनी दुध संस्था आदर्श पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा केली. स्पर्धेतील विजेत्या संस्थेला आकर्षक रक्कम देण्यात येणार असून, अशा स्पर्धेतून विकास हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक तथा गोकुळ प्रशासक मंडळ अध्यक्ष प्रदीप मालगावे, सहा.आयुक्त पशुसंवर्धन जि.प.डॉ. विद्यानंद देसाई, प्र.हाय्यक निंबधक सहकारी संस्था (दुग्ध) श्रीम.सुमती ढवण, गोकुळचे अधिकारी दयावर्धन कामत,धनाजी पाटील, आर.बी. दळवी, भारत मोळे,डॉ. नितीन रेडकर,जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर,जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व जिल्ह्यातील निवडक दुग्ध उत्पादक संस्थांचे चेअरमन व सचिव उपस्थित होते.

जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थेच्या माध्यमातून गोकुळच्या उत्पादनांचे आऊटलेट सुरू करण्यासंबंधी ही यावेळी चर्चा झाली श्वेतसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जिल्हा बँक व गोकुळ दूध संस्था याने एकत्रित संवाद करण्याबाबतही निर्णय यावेळी घेण्यात आला.

error: Content is protected !!