मालवण नगरपालिके कडून वायरी प्रभागातील विकासकामे तीन वर्षे राहिलेल्या
माजी नगरसेवक आप्पा लुडबेंकडून पालकमंत्र्यांना साकडं ; जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेकडून मागील तीन वर्षात दुर्लक्षित राहिलेल्या दोन विकास कामांसाठी भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत श्री. लुडबे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, माझ्या प्रभागातील असलेल्या एकमेव स्मशानाची शेड ही मागील तीन वर्षापासून स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असून केव्हाही पडून अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. मागील काही वर्ष या कामासाठी डी.पी.डी.सी. तून रक्कम मागणी करूनही या कामासाठी रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे हे काम होऊ शकलेले नाही. तसेच वायरी प्रभागातील शहराच्या हद्दीलगत पावसाळी पाण्यासाठी व्हाळी कमरोड करण्यासाठी मागील तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहे. परंतु या कामासाठीही निधी मिळत नाही. हे काम न झाल्याने वायरी चव्हाणवाडी, लुडबे वाडीतील अनेक घरात पावसाळी पाणी घुसून मालमत्तेची हानी होते. तरी या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध करून माझ्या प्रवर्गातील जनतेची होणारी गैरसोय दूर करावी. सदर दोन्ही कामांना तांत्रिक मंजूरी घेतलेली आहे. तरी मालवण नगर परिषद हद्दीतील देऊळवाडा स्मशानभूमी नूतनीकरण करणे व शेड बांधकाम करणे आणि वायरी अंबाजी शाळेजवळ मेस्त्री वाडी येथील परुळेकर घरापर्यंत आरसीसी गटार व काँक्रिट रस्ता बांधकाम करणे, या दोन कामांना निधी मिळावा, अशी मागणी आप्पा लुडबे यांनी केली आहे.