
माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून मागील अनेक वर्षांपासून ओळख असलेली परंतु, अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून काहीसं अलिप्त असलेलं सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे मालवण शहरातील मेढा राजकोट येथील प्रतिथयश मत्स्य व पर्यटन उद्योजक सहदेव बापर्डेकर…. मागील वर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रथमच उतरत जाईंट किलर म्हणून त्यांनी विजय संपादन केला. आज मालवण नगरपालिकेतील शिवसेना पक्षाचे नगरसेवक व पालिकेचे बांधकाम सभापती आणि मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून ते काम पहात आहेत. आज ३ ऑगस्ट ला त्यांचा ६० वा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या राजकीय वं सामाजिक कार्यातील वाटचालीचा थोडक्यात घेतलेला आढावा….
कुणाल मांजरेकर
सहदेव निळकंठ बापर्डेकर… मालवणच्या राजकीय वं सामाजिक चळवळीतील एक मोठे नाव… राणे कुटुंब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याशी घरोब्याचे संबंध असताना देखील ते सक्रिय राजकारणात फारसे सहभागी झाले नव्हते. फक्त कोणतीही निवडणूक आली की खा. नारायण राणेसाहेब, आमदार निलेश राणे व राणेसाहेबांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तन मन धन अर्पून काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या मालवण नगरपालिका निवडणुकीत सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव प्रथमच त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आणि समोर फार तगडे आव्हान असताना देखील जाईंट किलर बनून त्यांनी प्रभाग ६ मधून मोठे मताधिक्य घेऊन विजय मिळवला. आज मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती म्हणून ते काम पाहत आहेत.
मच्छिमार कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, वडिलांचे अकाली निधन, आई व चार बहिणींची जबाबदारी, सुरुवातीचे कष्ट, मच्छिमारी व्यवसाय, त्यानंतर ‘साईभक्ती’पासून सुरू झालेली व्यवसायाची वाटचाल, ट्रान्सपोर्ट, आईस फॅक्टरी, पर्यटन, होम स्टे, वॉटर स्पोर्ट्स अशा विविध व्यवसायांमध्ये केलेली यशस्वी वाटचाल, रोजगारनिर्मिती, सामाजिक कार्य, लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेली जबाबदारी हा सहदेव बापर्डेकर यांचा प्रेरणादायी व आदर्शवत प्रवास खऱ्या अर्थाने संघर्षातून कर्तृत्वाकडे जाणारा आहे. यश मिळाल्यानंतरही आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कारांशी असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. परिसरातील युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध स्तरातील नागरिक यांच्याशी त्यांचे आपुलकीने आणि विश्वासाचे नाते कायम आहे.

व्यवसाय आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनतेशी त्यांचे असलेले घट्ट नाते पुढे राजकीय क्षेत्रातही दिसून आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. सुरुवातीला काही काळ शिवसेना मालवण शहर प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर व्यवसायाच्या जबाबदारीमुळे ते राजकारणापासून काही काळ बाजूला होते. मात्र समाजसेवा अविरतपणे सुरू होती. २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत लोकआग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या विजयाची नोंद केली. निवडून आल्यानंतर मालवण नगरपरिषदेच्या बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या यांना प्राधान्य देत ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराचा सर्वांगीण आणि गतिमान विकास घडवून आणण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.
सहदेव नीलकंठ बापर्डेकर यांचा आज ६० वा वाढदिवस. हा वाढदिवस केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा नसून, संघर्षातून उभे राहिलेले कर्तृत्व, जिद्द, मेहनत, उद्योजकता, समाजसेवा, माणुसकी आणि कुटुंबवत्सलता या नात्यांची जपणूक करणाऱ्या एका प्रेरणादायी जीवनप्रवासाचा गौरव आहे. हिंदळे-मोर्वे येथील एका सामान्य मच्छिमार कुटुंबात जन्मलेल्या सहदेव बापर्डेकर यांनी परिस्थितीशी दोन हात करत स्वतःचे विश्व उभे केले. त्यांच्या आयुष्याची वाटचाल अनेक चढ-उतारांनी भरलेली असली तरी प्रत्येक संकटावर मात करण्याची जिद्द कुटुंब आणि समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची धडपड त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरली.सहदेव यांचे वडील निळकंठ बापर्डेकर हे पत्नी व मुलांच्या शिक्षणासाठी आणि कामाच्या शोधात मालवणच्या मेढा भागात आले. मच्छिमार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी अन्य ठिकाणी मासेमारीचे काम सुरू केले. याच संघर्षमय वातावरणात सहदेव यांचे बालपण घडले. मात्र नियतीने त्यांची परीक्षा लवकरच घेतली. सन १९८५ मध्ये वडिलांचे निधन झाले आणि अवघ्या लहान वयातच आई व चार बहिणींच्या कुटुंबाची जबाबदारी सहदेव यांच्या खांद्यावर आली. परिस्थितीसमोर न झुकता त्यांनी ही जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुरुवातीला अन्य ठिकाणी काम केले. कष्ट केले, अनुभव घेतला आणि हळूहळू स्वतःचा मच्छिमारी व्यवसाय उभा करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
‘साईभक्ती’पासून स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार
अथक मेहनत आणि धाडसाच्या बळावर सन १९९३ मध्ये त्यांनी ‘साईभक्ती’ ही आपली पहिली स्वतःची मासेमारी बोट बांधली. ही केवळ एक बोट नव्हती, तर संघर्षातून स्वावलंबनाकडे टाकलेले ते पहिले मोठे पाऊल होते. त्यानंतर त्यांनी मच्छिमारी व्यवसायासोबतच ट्रान्सपोर्ट व्यवसाय, आईस फॅक्टरी अशा विविध क्षेत्रांत पाऊल ठेवले. स्वतःची जागा घेऊन घर उभे केले. पुढे राजकोट येथे पर्यटन व्यवसाय, होम स्टे आणि वॉटर स्पोर्ट्स अशा विविध व्यवसायांमध्येही त्यांनी यशस्वीपणे प्रवेश केला.
“माणूस मोठा होतो तो केवळ संपत्तीने नव्हे, तर त्याने किती माणसे जोडली आणि किती जणांच्या आयुष्याचा आधार बनला,”या भावनेला आपल्या कृतीतून अधोरेखित करणारे सहदेव बापर्डेकर हे जनसेवेच्या अखंडित मार्गांवरील दिपस्तंभ ठरतात.
व्यवसाय करताना केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा पैलू राहिला आहे.सन २००० मध्ये राजकोट मच्छिमार सोसायटीच्या स्थापनेत संस्थापक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मच्छिमार समाजाच्या अडचणी, गरजा आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून समाजाला संघटित करण्याचे काम त्यांनी केले. यशस्वी वाटचाल पुढे नेत त्यांनी संस्था माध्यमातून मासेमारी बोटी उभारल्या. ११ बोटींच्या माध्यमातून अनेक मच्छिमारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळत संसाराची उभारणी
डिलांच्या निधनानंतर आई आणि चार बहिणींची जबाबदारी सांभाळत त्यांनी बहिणींची लग्ने झाली. सहदेव बापर्डेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे एकत्र कुटुंबाची भावना आणि नाती जपण्याची वृत्ती. कुटुंबातीलच नव्हे तर सर्व नातेवाईकांना एकत्र जोडून ठेवणे, सुख-दुःखात प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणे आणि माणसांशी आत्मीयतेचे नाते निर्माण करणे, ही त्यांची खासियत राहिली. आपल्या मूळ हिंदळे-मोर्वे गावी ते नेहमी धार्मिक व सामाजिक कार्यातून जोडलेले असतात. रक्तदान क्षेत्रातही त्यांचे योगदान पहिल्या पासून राहिले. अनेक रुग्णांसाठी ते देवदूत ठरले. त्यांच्या सेवा कार्याचा झरा अखंड वाहत आहे.
१९९७ साली सहदेव बापर्डेकर यांचा विवाह झाला. त्यांच्या संपूर्ण वाटचालीत पत्नी सौ. गीता यांची भक्कम साथ लाभली. संसार, व्यवसाय, सामाजिक कार्य आणि विविध जबाबदाऱ्या सांभाळताना पत्नीने दिलेली साथ त्यांच्या यशाच्या प्रवासातील महत्त्वाचा आधार ठरली. आज त्यांची दोन मुलेही व्यवसायात लक्ष घालत असून, पुढील पिढीलाही कष्ट, व्यवसाय आणि स्वावलंबनाची प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करण्याची हातोटी आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी मदतीसाठी तत्पर राहण्याची वृत्ती यामुळे संपूर्ण परिसरात त्यांच्याविषयी आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण आहे.
२८ वर्ष लायन्स परिवारात…
२८ वर्षांपासून लायन्स क्लबच्या सेवाकार्यात सक्रिय रहात सामाजिक क्षेत्रातही सहदेव बापर्डेकर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गेली २८ वर्षे ते लायन्स क्लब परिवाराशी जोडलेले आहेत. आरोग्य, शिक्षण, सामाजिक मदत, गरजू व्यक्तींना सहाय्य, विविध सेवा उपक्रम आणि समाजोपयोगी कामांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावर्षी सर्वांच्या आग्रहास्तव त्यांनी मालवण लायन्स क्लबचे अध्यक्षपद स्वीकारले. अध्यक्ष म्हणूनही सेवाकार्याची परंपरा अधिक व्यापक करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत समाजातील विविध घटक त्यांच्याकडे विश्वासाने पाहत आहेत. त्यांचा संघर्षातून यशापर्यंतचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्याची ६० वर्षे पूर्ण करताना सहदेव बापर्डेकर यांच्याप्रेरणादायी जीवनप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा !ईश्वरचरणी प्रार्थना की, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश, ऊर्जा आणि समाजसेवेचे बळ लाभो. त्यांच्या हातून मालवण शहराचा विकास अधिक वेगाने घडो, परिसरातील युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होवोत, व्यावसायिक, सामाजिक कार्याचा विस्तार वाढत राहो आणि जपलेली माणुसकीची नाती अशीच अधिक दृढ होत राहोत, ह्या सदिच्छा…!





Subscribe to my channel






