‘पार्थ’ जहाजा वरून तेल गळती सुरू…. दोन दिवसांत मालवणची किनारपट्टी गाठणार ?
कोस्ट गार्डचे कमांडर सचिन सिंग यांनी व्यक्त केली शक्यता
मालवण किनारपट्टीवर संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी रंगीत तालीम
प्रशासनाकडून अधिकृत माहिती जारी करेपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका : तहसीलदारांचे आवाहन
मालवण ( कुणाल मांजरेकर)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते देवगड समुद्रकिनारी ४० ते ४५ वावामध्ये बुडालेल्या पार्थ जहाजातील तेल गळती सुरु झाली आहे. यापूर्वी मॉरिशस मध्ये अशी दुर्घटना घडली होती. यामध्ये सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य आणि पर्यटन व्यवसायाला याचा फटका बसू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी मालवण शहरातील चिवला बीच समुद्र किनारी गळती प्रतिबंधात्मक रंगीत तालीम घेण्यात आली. हे तेल येत्या दोन दिवसांत मालवण परिसरातील समुद्र किनाऱ्यावर येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने किनारपट्टी वरील प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत कोस्टल गार्डचे कमांडर सचिन सिंग यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रात बुडालेल्या पार्थ तेल वाहू जहाजातून तेल गळती सुरू झाल्याने ते तेल समुद्र किनारी येण्याची शक्यता आहे. यासाठी उपाययोजना म्हणून तेलाचे काळे गठ्ठे समुद्रामध्येच रोखण्यासाठी व किनाऱ्यावर येऊन लागलेल्या तेलाला मासेमारी करणाऱ्या जाळ्याच्या सहाय्यातून बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक चिवला बीच समुद्र किनारी रत्नागिरी कोस्टल गार्डचे कमांडर सचिनसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखविण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, पोलीस निरिक्षक विजय यादव, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त आर.जी. मालवणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, किनारपट्टी वरील गावांचे सरपंच, ग्रामसेवक, सागर रक्षक दलाचे सदस्य, एनसीसीचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात ‘पार्थ’ हे १०१ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त झालेले होते. कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सदर जहाजातून १९ सप्टेंबर पासून तेल गळतीस प्रारंभ झालेला आहे. या तेलाचे पाण्यामध्ये तयार झालेले गठ्ठे समुद्रकिनारी येण्याची शक्यता असल्याने याची खबरदारी म्हणून रत्नागिरी कोस्टल गार्डचे कमांडर सचिन सिंग यांनी मालवण येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात प्रात्यक्षिक दाखविले. या वेळी आपत्ती पूर्व नियोजन व रंगीत तालीम शिबीर घेण्यात आले.
यावेळी तहसीलदार अजय पाटणे म्हणाले, केंद्र शासनाच्या आदेशानुसार व काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून कोस्टल गार्डच्या सहाय्याने मच्छीमारांच्या जाळ्यामधून समुद्रामध्येच तेलाचे गठ्ठे जाळ्यामध्ये जेरबंद करुन बाहेर काढण्यात कसे येतील, हे तेलाचे गठ्ठे कशा स्वरुपाचे आहेत, कसे हाताळायला पाहिजेत, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. जोपर्यंत प्रशासनामार्फत अधिकृत माहिती जाहीर होत नाही, तोपर्यंत समाज माध्यमावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये., असे ते म्हणाले.