जागतिक परिचारिका दिनानिमित्त आ. वैभव नाईक यांच्या हस्ते परिचारिकांचा कौतुक सोहळा
ओरोस जिल्हा रुग्णालयात आयोजन ; सत्काराने परिचारिका भारावल्या
कोरोना काळात परिचारिकांनी दिलेल्या सेवेमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले – आ. नाईक यांचे गौरवोद्गार
मालवण : नर्सिंग ही खऱ्या अर्थाने ईश्वर व देशसेवा आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरांसमवेत रुग्णांना जी सेवा दिली, त्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकले, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या कामगिरीचे कौतुक केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या वतीने खास कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉ. जोशी व जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन श्रीमती वसावे सिस्टर उपस्थित होत्या. या प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान दुपारी आ. वैभव नाईक यांनी या परिचारिकांसमवेतच जेवण करून त्यांचा आनंद द्विगणित केला. यावेळी बोलताना आमदार नाईक यांनी पुढील वर्षापासून जिल्हास्तरावर एकत्र व मोठ्या स्वरुपात कार्यक्रम आयोजित करण्याची संकल्पना मांडून त्यासाठी आपली सर्वतोपरी मदत राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी शेखर सामंत यांनी देखील विचार मांडले. त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या कार्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढताना जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका तृप्ती पुजारे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अनेक अडचणी आल्या असता आ. वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर देत मदतकार्य केल्याची आठवण करून दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत कोरोना काळात उत्तम कामगिरी बजावलेल्या परिचारिकांचा आ. वैभव नाईक, शेखर सामंत, डॉ. जोशी व मेट्रन वसावे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.