मालवणात मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रशासनाकडून दुर्लक्षित ….

मनसेने वेधले लक्ष ; आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

मालवण : परप्रांतियांची नोंद होण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी मालवण तालुका मनसे पदाधिकारी यांनी तहसीलदार पोलिस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नायब तहसिलदार आनंद मालवणकर,गंगाराम कोकरे तसेच पोलिस उपअधिक्षक नराळे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन स्विकारले. यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,सौ.भारती वाघ,उदय गावडे,निखिल गावडे,राजु गिरकर,जयंत पिंगुळकर,विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय लोकांचे नोंद ठेवण्याचे आदेश अलिकडेच दिले आहेत.केंद्र सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवेच्या अटी) अधिनियम, 1979 हा कायदा लागु केला आहे.परंतु या कायद्याची अंमलबजावणी मालवण तालुक्यात होताना दिसत नाही. आज तालुक्यात विविध क्षेत्रात परप्रांतिय लोक काम करत आहे.या परप्रांतियात मजुर म्हणुन काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.हे परप्रांतिय लोक अनधिकृत पणे राहत आहेत. स्थलांतर स्थलांतरित कामगार कायद्याप्रमाणे त्यांची नोंद नाही. सबब सदर बाब गंभीर स्वरुपाची असुन मालवण तालुक्यात या परप्रांतियांकडून येणाऱ्या काळात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडू शकतात.जिल्ह्यात सावंतवाडी,दोडामार्ग येथे गेल्या दोन तीन वर्षात परप्रांतियांकडून खुन,दरोडा या सारखे गुन्हे घडले आहेत.अजुनही काही आरोपी बेपत्ता आहेत.पोलिस यंत्रणेचा बराच कालावधी आरोपींना शोधण्यासाठी जात आहे.म्हणुन मालवण तालुक्याला भविष्यात होणारा धोका लक्षात घेता परप्रांतीय लोक ज्यात प्रामुख्याने मच्छिमारीसाठी येणारे खलाशी,बांधकाम कामगार,वाळु कामगार,चायनीज सेंटर मध्ये काम करणारे तसेच आंबा बागेत काम करणारे नेपाळी,हाॕटेल मध्ये काम करणारे मजुर,चिरे खाण कामगार,विंधन विहीर(बोअरवेल) खोदणारे कामगार,केशकर्नालय कामगार या सर्वांची नोंद फोटो ओळखपत्रासहीत होणे आवश्यक आहे.नोंद होण्यासाठी तहसिल कार्यालय व पोलिस यंत्रणा यांनी सहमतीने नोंदणी अधिकारी प्राधिकृत करावा.अशी आपणास आम्ही नम्र सुचना करत आहोत. तरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची आपलेकडून त्वरीत अंमलबजावणी होणे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवणच्या वतीने आम्ही सर्व मनसे पदाधिकारी हे पत्र सादर करत असल्याचेही म्हटले आहे.



      

     
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!