
कसाल येथे आयोजन; शासकीय योजनांचा लाभ, मोफत कायदेविषयक सल्ला आणि आरोग्य तपासणीची सुविधा एकाच छताखाली
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वंचित, दुर्बल आणि गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी रविवार, २२ नोव्हेंबर रोजी कसाल येथे भव्य कायदेविषयक सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हे शिबिर होणार असून, शासकीय योजनांचे लाभ, मोफत कायदेविषयक सल्ला आणि आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाशिबिर आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा वकील संघ तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे.
विविध योजनांचे अर्ज जागेवरच भरता येणार
महाशिबिरात विविध शासकीय व निमशासकीय विभागांचे स्वतंत्र माहिती आणि सेवा स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती, पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मोफत कायदेविषयक सल्ला आणि आरोग्य तपासणी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येणार आहे. कायदेशीर हक्क, शासकीय योजनांचा लाभ आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरणही करण्यात येईल. याशिवाय आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड आणि आधार कार्ड अद्ययावत करण्यासह विविध सेवांचा लाभ घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
नियोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची बैठक
महाशिबिराच्या नियोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑक्टोबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाशिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय आणि सुसूत्रता राखून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना डॉ. सुधीर देशपांडे यांनी यावेळी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू लाभार्थ्यांनी या महाशिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि उपलब्ध शासकीय योजनांसह मोफत विधी सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे.







Subscribe to my channel






