Devbag | डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुल समोरील रस्त्याची तात्काळ डागडुजी होणार 

मनसेने लक्ष वेधल्यानंतर तालुका प्रशासन “ऍक्टिव्ह” मोडवर ; तहसीलदार, सा. बां. अधिकाऱ्यांकडून पाहणी ; देवबाग ग्रा. पं. कडून श्रमदानाने रस्त्यावरील पाण्याचा निचरा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या समोरील रस्त्यावर सातत्याने पावसाचे गुडगाभर पाणी साचत असल्यामुळे शालेय मुलांची गैरसोय होत असून या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना प्रशालेत ये जा करावी लागत असल्याची परिस्थिती मनसे तालूकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तालुका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

याठिकाणीच विजेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने येथील पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी देवबाग ग्रामपंचायत सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच बिलये यांच्यासह सहकारी सदस्य व ग्रामस्थांनी याठिकाणचे पाणी हटवण्यासाठी श्रमदान केले. तर तहसीलदार यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजित पाटील यांनी येथे पाहणी करुन याठिकाणी गटार बांधण्याबरोबरच येथील खड्डे तात्काळ भरण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.

देवबाग मधील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या समोर दरवर्षी पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे विद्यार्थी व येथील ग्रामस्थाना देखील या पाण्यातून वात काढावी लागते. अलीकडे सुरु असलेल्या संततधार पावसात या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना या पाण्यातून वाट काढत शाळेत ये जा करावी लागत आहे. शाळेत येताना या ठिकाणच्या खड्ड्यात पाय अडकून एक दोन मुले खाली पडली. या ठिकाणीच विजेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. याठिकाणी रस्त्यात साचणारे पाणी गेल्यास मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथील पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग करणे आणि रस्त्याची उंची वाढवणे आवश्यक आहे. तरी तालुका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा ग्रामस्थांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनाने याठिकाणी तात्काळ उपाययोजना हाती घेतली असून येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!