“त्या” कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्या ; आप्पा लुडबे यांची मागणी
पालिकेने ठराव करून तहसीलदारांना पाठवावा ; मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष
मालवण : कोरोना महामारीच्या काळात शहरातील अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जे कुटुंब निराधार झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालिकेने आवश्यक तो ठराव करून तो तहसीलदारांकडे पाठवावा अशी मागणी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात देशाबरोबरच शहरातील अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. या महामारीच्या काळात शहरातील सुमारे 71 जणांना आपला प्राण गमवावा लागला. या 71 जणांपैकी अनेकजण कुटुंबप्रमुख होते. कर्त्या पुरुषांच्या निधनामुळे कुटुंब निराधार बनले आहे. अशा कुटुंबांना सद्यःस्थितीत दोन वेळचे जेवण मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले आहे व जे कुटुंब निराधार झाले आहे अशा कुटुंबांचा तातडीने सर्वे करण्यात यावा. त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालिकेने आवश्यक ठराव करावा. संबंधित व्यक्तींच्या नावांसह ठराव करून तो तहसीलदारांना सादर करावा. यामुळे सर्व निराधार कुटुंबांना शासनाच्या अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना कमी दराचा धान्य पुरवठा करता येईल व त्यांना जीवन जगणे सुसह्य होईल. यादृष्टीने तत्काळ सर्वे करून पालिकेने आवश्यक ठराव करावा अशी मागणीही श्री. लुडबे यांनी केली आहे.