शिवसेना आमदार वैभव नाईक उद्या तातडीने मालवणात !
शिवसेनेतील नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर दौरा जाहीर ; अंतर्गत बंडाळी थांबवण्यात यश मिळणार का ?
कुणाल मांजरेकर
मालवण : माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेत अंतर्गत बंडाळी निर्माण झाली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेच्या ताब्यातील दोन वर्षातील नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक शुक्रवारी ११ मार्च रोजी तातडीने मालवण शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. नगरपालिका आणि शिवसेना शाखेत ते भेट देणार असून शिवसेनेत निर्माण झालेली बंडाळी दूर करण्यात त्यांना यश येणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मालवण नगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शहरात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असून कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा बुधवारी मुंबईत युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला. या प्रवेशानंतर शिवसेनेत अंतर्गत बंडाळी निर्माण झाली आहे. या प्रवेशावरून सोशल मीडियावर काही शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी प्रसिद्धीपत्रक देत आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. महेश जावकर यांच्यावर आरोप करतानाच शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या राणे समर्थकांवरही त्यांनी टीका केली असून या दोन वर्षात मालवण नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. नगरपालिकेच्या कारभारावर आरोप करताना आमदार वैभव नाईक यांच्या मुळेच २५ वर्षात शहराला आला नाही एवढा निधी या पाच वर्षात वैभव नाईकांनी आणल्याचा उल्लेखही गणेश कुडाळकर यांनी केलाय. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक शुक्रवारी ११ मार्च रोजी दुपारनंतर मालवण शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३ ते ५ या वेळेत ते नगरपालिकेला भेट देणार असून सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शिवसेना शाखेत उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा जाहीर झाल्याने शिवसेनेतील नाराजी नाट्य दूर करण्यात आमदारांना यश येणार का ? की गणेश कुडाळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.