मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बससेवेला हिरवा झेंडा; संजय पांडेय यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांसाठी विशेष उपक्रम
मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा आज मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईतून कोकणाकडे रवाना होत असतात. या काळात रेल्वे, एसटी तसेच खासगी वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेऊन गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी या मोफत लक्झरी बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या बससेवेमुळे वर्सोवा परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांना मोफत आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गावी जाणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. बससेवेच्या शुभारंभप्रसंगी स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कोकणवासीय उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले.