खा. नारायण राणे यांचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार ; स्वागत समितीचे नियोजन

१० एप्रिलला अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार

संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महोत्सवी वाढदिवस…

मालवण : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांचा दि. १० एप्रिल रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांनी अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती स्थापन केलेली असून समिती तर्फे ७४ व्या वाढदिवसापासून अमृत महोत्सव अर्थात ७५ व्या वाढदिवसापर्यंत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून हे अमृत महोत्सवी वर्ष यादगार बनविण्याचे निश्चित केलेले आहे.

१० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालय कणकवली समोरील पटांगणावर राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमानंतर लगेचच प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह गायनाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, हितचिंतक तसेच समस्त जिल्हावासियानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागत समिती कडून करण्यात येत आहे.

यावेळी राणेसाहेबाना शुभेच्छा देताना पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक स्वरूपात भेट स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जेणेकरून भेटीद्वारे संकलित पुस्तकांचे वितरण जिल्ह्यातील ग्रंथालयांना करण्यात येवून जिल्ह्यात वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल.

या वाढदिवसापासून दि. १० एप्रिल २०२७ पर्यंत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम या अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती तर्फे राबविण्यात येणार आहेत. अशाप्रकारे ज्या नेत्याने आपले संपूर्ण आयुष्य कोकण वासिय जनतेच्या कल्याणकरिता समर्पित केले, त्या समर्पणाचा यथोचित गौरव या निमित्ताने करण्याची संधी जिल्हा वासियांना प्राप्त झालेली आहे. तरी दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समितीतर्फे करण्यात आलेले आहे

error: Content is protected !!