निलेश राणेंकडून कुडाळ, मालवणच्या महिला क्रिकेट संघाला आर्थिक मदत ; उद्या वितरण
मालवण : मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे पुढील सामना खेळण्यासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनी सर्वसामान्य कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मध्यप्रदेश मध्ये जाणे शक्य होत नव्हते. याबाबत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व नगरसेवक दीपक पाटकर यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर श्री. राणेनी महिला संघाच्या प्रवासाचा खर्च उचलून आर्थिक हातभार लावला आहे.
बुधवार दि.६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता शहर भाजपा कार्यालय येथे या महिला संघाला आर्थिक मदत सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, जि. प. चे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, उपसभापती राजू परुळेकर, गटनेते गणेश कुशे, दीपक पाटकर, बाबा परब, माजी जि. प. अध्यक्षा सौ. सरोज परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहर मंडल प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.