मालवण : आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. पालिकेवर २० पैकी १० जागा घेऊन शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळवले असून आता उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना मिळालेल्या माहितीनुसार सलग तीनवेळा नगरसेवक पद मिळवणाऱ्या कार्यसम्राट नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दीपक पाटकर हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. सलग तिसऱ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्या विजयाचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांनी सर्व ताकद पणाला लावली असताना देखील विरोधकांचा चक्रव्युह भेदत त्यांनी स्वतः बरोबरच आपल्या सोबतच्या शिवसेना उमेदवार नीना मुंबरकर यांच्या विजयातही महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मालवण नगरपालिकेत त्यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.