
आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा; डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती
कुडाळ : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे काही काळापासून बंद असलेली सोनोग्राफी सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असतानाही मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद होती. त्यामुळे महिला व गर्भवती रुग्णांसह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना सोनोग्राफीसाठी बाहेरील केंद्रांवर अवलंबून राहावे लागत होते.
ही बाब लक्षात घेऊन रुग्ण कल्याण समितीवरील आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सोनोग्राफी सेवेसाठी डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली असून रुग्णालयातील ही सेवा आता पूर्ववत झाली आहे.
रुग्णालयात दर बुधवार आणि शनिवार दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कुडाळ तसेच परिसरातील महिला आणि इतर रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेरील ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार असून त्यांना रुग्णालयातच ही सुविधा मिळणार आहे.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात स्त्रीरोग तपासणी व उपचार, प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया, विविध आजारांची तपासणी व उपचार तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांसारख्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू झाल्याने रुग्णालयातील उपलब्ध सुविधांमध्ये आणखी भर पडली आहे.
“रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही मनुष्यबळाअभावी सेवा बंद होती. त्यामुळे रुग्णांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. आता डॉ. राजेश उबाळे यांच्या नियुक्तीमुळे सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू झाली आहे,” अशी माहिती आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी दिली.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय रुग्णालयातून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून पुढील काळातही आवश्यक बाबींचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही सौ. रश्मी नाईक यांनी सांगितले.







Subscribe to my channel






