पावशी-माणगावात करपलेल्या भातशेतीची माजी आ. वैभव नाईकांकडून पाहणी

पंचनामे तातडीने पूर्ण करून सरसकट नुकसानभरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा

कुडाळ : अपुऱ्या पावसासोबतच वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातपीक करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील पावशी आणि माणगाव येथे नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली.

राज्य सरकारने भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवात झालेली नसल्याबद्दल वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान मोठे असताना प्रशासनाने विलंब न करता प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीची पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

“शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकारने गांभीर्याने पाहावे. तातडीने सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल,” असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

पावशी येथे झालेल्या पाहणीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, बाळा पावसकर, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, माजी उपसभापती जयभारत पालव, सुशील चिंदरकर, बाळू पालव, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, ग्रा.पं. सदस्य काका भोगटे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत कुंभार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

पावशी येथील शेतकरी जयराम वराडकर, न्हानु तोटकेकर, राजन तवटे आणि किशोर तवटे यांच्या भातशेतीचीही पाहणी करण्यात आली. यानंतर माणगाव कुंभारवाडी येथे शेतकरी पांडुरंग कुंभार, तसेच माणगाव कोठीची राई येथील हर्षद धुरी, सुभाष धुरी आणि उमेश देसाई यांच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते योगेश धुरी, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, विभागप्रमुख एकनाथ धुरी, उपविभागप्रमुख शैलेश शिरोडकर, नानेली ग्रामपंचायत सदस्य विनय कदम, माणगाव ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, ईश्वरी सावंत, काजल नाईक, बंटी भिसे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!